सोलापूर (प्रतिनिधी ) राज्यात गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला, खर्रा-मावा यांच्या वाढत्या विक्रीवर अखेर सरकारने मोठा दणका देण्याचे ठरवले आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी थेट ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, यामुळे गुटखा माफियांची पुरती दमछाक होणार आहे.
मंत्रालयात नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुटखा रॅकेटचे धागेदोरे परराज्यांपर्यंत असून, त्यात काही शासकीय अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले.
“या भ्रष्ट मंडळींना मी अजिबात सोडणार नाही. शासकीय अधिकारी गुन्ह्यात सापडले तर थेट निलंबन,” असा इशारा झिरवाळ यांनी दिला.
मंत्री झिरवाळ यांनी एका धक्कादायक वास्तवाची माहिती दिली- जाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाला सुपारीचा आकार देणे ,त्यावर रंग-केमिकल लावणे आणि नंतर बाजारात सुगंधित गुटखा म्हणून विक्री हा उद्योग तरुणांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ करणारा गंभीर गुन्हा आहे, असे मंत्री झिरवळ म्हणाले.गुटखा सेवनामुळे नपुंसकत्व, कर्करोग आणि इतर भयानक आजार वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य सूत्रधार, उत्पादक व विक्रेत्यांवर थेट ‘मोक्का’,
दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन आणि विभागीय चौकशी,पोलिस, अन्न व औषध प्रशासन आणि शिक्षण विभागाची संयुक्त धाडमोहीम शाळा-कॉलेजांमध्ये जनजागृती मोहीम,गुटखा तस्करी रोखण्यासाठी सीमांवर विशेष पथके गुटखा तस्करांमध्ये आणि अवैध विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर धाडी, जप्ती, अटक मोहीम सुरू होणार असून, गुटखा माफियांचे कंबरडे मोडण्याचा सरकारचा निर्धार स्पष्ट दिसत आहे.
“गुटखाबंदी कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिसली पाहिजे,”असे ही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले असले तरी सोलापूर शहरात मात्र अनेक गुटखा माफिया मोकाट फिरत असून लाखों रुपयांच्या गुटखाची सोलापूर शहरात उलाढाल होत असून कारवाई मात्र दीडदमडीची दिसतं असून अन्नऔषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरचं आता प्रश्न निर्माण झाला असून राज्य सरकार ने बंदी घालतलेला गुटखा सोलापूर शहरात कोणाच्या आशीर्वादाने येतोय ? याला जबाबदार कोण? अवैध गुटखा बाबत खरंच गुटखा माफियावर मोक्का अंतर्गत कारवाई होणार का? त्याच बरोबर सोलापूर शहरातील प्रतिबंधीत गुटखा ला जबाबदारअसणाऱ्यां अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार का ? मंत्री झिरवळ यांची गर्जना हवेत विरळू नये अशी अपेक्षा सोलापूर मधील सुज्ञ नागरिक करत आहेत.
*सोलापूर स्मार्ट सिटी की डर्टी सिटी*?
सोलापूर शहर हे शासन दरबारात स्मार्ट सिटी म्हणून गणले जात असले तरी शहरात जागोजागी पान टपरी किराणा दुकानात शाळा कॉलेज जवळ इतकंच काय शासकीय कार्यालयाजवळ देखील गुटखा बिनधास्त विकला जातोय याची माहिती अन्नऔषध प्रशासनाच्या अन्न निरीक्षकांना नसते का? असा प्रश्न सोलापूर मधील सुजान नागरिकांना पडला असून अन्ननिरीक्षक नेमकं करतात तरी काय ? असा सवाल उपस्थित होत असून खरंच मंत्री महोदय सोलापूर मधील गुटखा माफियांना मोक्का अन अन्नऔषध प्रशासन मधील अधिकाऱ्यांना निलंबित करणार का असा प्रश्न विचारला जात आहे

