सोलापूर (प्रतिनिधी ) तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या तरुणाविरुद्ध सलगर वस्ती पोलिसांनी तत्काळ तपास केला. त्याला अटक करत २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
चिंचोली एमआयडीसीत मजुरी करणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून बायको माहेरी गेली होती. त्या तरुणाने परिसरातील तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लिल कृत्य केल्याची घटना समोर आली. सलगर वस्ती पोलिसांनी त्याला अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. चंद्रकांत ऊर्फ बाबुशा पिरप्पा जाधव (वय ३८) असे त्या तरुणाचे नाव आहे. गल्लीतील दोन मुलींसमवेत बाबुशाने अश्लिल कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता. चार दिवसांपूर्वी त्याने पुन्हा घराजवळ खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलीला एकटी पाहून जवळ बोलावले. तिच्यासोबत अश्लिल कृत्य करताना ती घरी पळून गेली घाबरलेल्या मुलीला आईने विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने आपबिती सांगितली. त्यावेळी गल्लीत गोंधळ झाला आणि पीडितेच्या आईने
सलगर वस्ती पोलिसांत धाव घेतली. त्यावेळी भीतीने पुढे न आलेल्या दोन अल्पवयीन मुलींच्या आई देखील तक्रार द्यायला पुढे आल्या. पोलिसांनी जवाब नोंदवून संशयितास तातडीने अटक केली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले आहे. दरम्यान, त्या तरुणाचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला असून त्याच्या अशा कृत्यांमुळे पत्नी माहेरी गेल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांनी तातडीने ७४ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात पाठविले आहे.
खटला 'फास्ट ट्रॅक'मध्ये चालवावा'
संशयित आरोपीने परिसरातील तीन अल्पवयीन मुलींसमवेत अश्लिल कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली. त्याला पोलिसांनी लगेच अटक करून न्यायालयात नेले. २४ तासांत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र तयार केले. हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवावा, अशी विनंती सलगर वस्ती पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे.
