सोलापूर (प्रतिनिधी ) शहर गुन्हे शाखेच्या पथकाने "जमिनीतून गुप्त धनाचा हांडा काढून देतो" असे सांगून तब्बल १ कोटी ८७ लाख ३१ हजार ३०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
फसवणुकीचा प्रकार कसा उघडकीस आला
अर्जदार गोविंद मल्लिकार्जुन वंगारी (रा. सोलापूर) यांनी सोलापूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती की, मोहम्मद कादर शेख या इसमाने त्यांच्या घरामधून गुप्त धनाचा हांडा काढून देतो असे सांगून त्यांना अमिष दाखवले.
या मोहम्मद शेख नावाच्या भोंदू बाबाने वंगारी यांना काहीतरी द्रव्य पिण्यास देऊन जादूटोणा केल्याचे नाटक केले आणि त्याकरिता वेळोवेळी मोठी रक्कम मागून घेतली. एकूण रक्कम तब्बल ₹1,87,31,300/- इतकी झाली.
या प्रकरणात फिर्यादीची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याने गुन्हा नोंदवण्यात आला
गुन्हा दाखल आणि तपासाची दिशा
या तक्रारीची चौकशी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी केली. चौकशीदरम्यान सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे जेलरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. ५१५/२०२५ नोंद करण्यात आला.
सदर गुन्हा भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४१७, ४२०, तसेच महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ चे कलम ३(२) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्याकडे सोपविण्यात आला.
विजापूरमध्ये थरारक कारवाई — भोंदू बाबा पकडला
तपासादरम्यान पोलिसांना आरोपी विजापूर (कर्नाटक राज्य) येथे लपल्याची गोपनीय माहिती मिळाली.
गुन्हे शाखेने चार वेगवेगळी तपास पथके तयार करून शोध मोहीम राबवली.
त्यात सपोनि दत्तात्रय काळे यांच्या पथकाला निर्णायक यश मिळाले.
दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांचे सहकारी विजापूर येथे दाखल झाले.
तेथे आदिलशाही नगर, जर्मन बेकरीजवळ मोहम्मद कादरसाब शेख हा आरोपी असल्याचे समजले.
त्यानंतर पथकाने छापा टाकून त्याला घरातून अटक केली.
तपासादरम्यान त्याच्याकडून जादूटोण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
न्यायालयीन प्रक्रिया सुरू
आरोपीस न्यायालयात हजर केले असता १३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने हे स्वतः करत आहेत.
पोलीसांचे आवाहन
सोलापूर पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,
> "जर कोणाचीही अशा प्रकारे जादूटोणा, ताईत, मंत्र किंवा गुप्त धनाच्या नावाखाली फसवणूक झाली असेल, तर त्वरित आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असं आवाहन गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी नागरिकांना केल आहे
