Type Here to Get Search Results !

उद्याचा धार्मिक स्थळांच्या भोंग्यांविरोधातील मोर्चा रद्द, पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या शिष्ठाईला यश

 


सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील धार्मिक स्थळांवरील भोंगे काढून टाकावेत, या मागणीसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढून सभा घेण्यात येणार होती. त्यासाठी आयोजकांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी तातडीने आयोजकांसमवेत बैठक घेतली आणि तो मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.


सकल हिंदु समाजातर्फे धार्मिक स्थळांवरील भोंग्याविरोधात मोर्चा व सभा घेतली जाणार होती. मल्लिकार्जुन मंदिर - बाळीवेस - टिळक चौक-मधला मारूती- कोंतम चौक ते कन्ना चौक असा त्या मोर्चाचा मार्ग होता. मोर्चा विसर्जित करताना कन्ना चौकात सभा घेण्याचेही नियोजन होते. आयोजकांनी पोलिसांकडे परवानगी मागितल्यानंतर पोलिस आयुक्त एम. राज कुमार


यांनी आयोजकांसमवेत बैठक घेतली. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने दिलेले आदेश, पर्यावरण संरक्षण कायदा-१९८६ व ध्वनी विनियम व नियंत्रण कायदा-२००० मधील तरतुदीनुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या धार्मिक स्थळांवरील भोंगे काढून त्याठिकाणी कार्यवाही केल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी आयोजकांना दिली. तसेच सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने शहरात महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ३६ प्रमाणे आदेश लागू आहेत. त्यामुळे अशावेळी मोर्चा काढणे योग्य राहणार नाही, अशी सूचनाही यावेळी आयोजकांना करण्यात आली. त्यानंतर आयोजकांनी पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त करीत मोर्चा, सभा रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. एकंदरीत उद्याचा धार्मिक मोर्चा रद्द करणे बाबत च्या पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या शिष्ठाईला यश आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.