सोलापूर (प्रतिनिधी)
मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांमध्ये गणेशोत्सवासह वर्षभरात साजरे होणारे सर्व महापुरुषांच्या जयंती मिरवणुकीत डॉल्बी न लावण्याचा निर्णय सर्व समाज घटकातील प्रमुख मंडळी व शांतता कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. तरीही कोणी डॉल्बी लावून कायद्याचे उल्लंघन केले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मंद्रुप पोलीस ठाण्यामध्ये शांतता कमिटीची बैठक झाली. या बैठकीला राजकीय पक्षासह व सर्व समाज घटकातील प्रमुख उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी डॉल्बी मुक्त मिरवणुका काढण्याची सुचना दिली.
३८ गावात डॉल्बी मुक्त मिरवणुका...
यावेळी बोलताना भाजपचे राज्य परिषदेचे सदस्य
हनुमंत कुलकर्णी यांनी डॉल्बी मुक्त मिरवणुका ही काळाची गरज आहे. कारण डॉल्बी मुळे शांतता भंग होते. ध्वनि प्रदूषणाबरोबर आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. मंद्रूप पोलीस ठाणेच्या हद्दीतील सर्वच गावात डॉल्बी मुक्त मिरवणुका निघाल्या पाहिजेत.
माजी उपसरपंच रमेश नवले व सचिन साठे यांनी शिवजयंती असो किंवा गणेशोत्सव यामध्ये आम्ही पारंपारिक वाद्य वापरतो. डॉल्बीला आमचा विरोध असल्याचे सांगितले.
यावेळी सचिन फडतरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत यंदा आम्ही डॉल्बी लावणार नाही असा शब्द दिला. तर ग्रामपंचायत सदस्य यासीन मकानदार व अध्यक्ष दानेश शेख यांनी पैगंबर जयंतीच्या मिरवणुकीत डॉल्बी लावणार नसल्याचे सांगितले.बसवेश्वर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हाळप्पा घाले यांनी गणेशोत्सव व महात्मा बसवेश्वर जयंती मिरवणुकीत डॉल्बी न लावता पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढू असे सांगितले. तर बंजारा समाजाचे नेते मोतीराम चव्हाण यांनी गणेशोत्सव व सेवालाल महाराजांची जयंती यामध्ये डॉल्बी न लावता आम्ही मिरवणूक काढू, असे सांगत सर्वांनी डॉल्बी न लावण्याचा घेतलेला निर्णय चांगला असल्याचे सांगितले. माजी सरपंच पिराप्पा म्हेत्रे व गौरीशंकर मेंडगुदले यांनी डॉल्बीला विरोध करताना मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांमध्ये डॉल्बीमुक्त मिरवणुका निघाल्या पाहिजेत. यासाठी पोलीस प्रशासनाने कायद्याचा वापर करावा असे सांगितले. तर आप्पासाहेब व्हनमाने व सुनील व्हनमाने यांनी अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या मिरवणुकीत डॉल्बी न लावण्याचे आश्वासन दिले.
शांतता कमिटीच्या या बैठकीस माजी सभापती अप्पाराव कोरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रेवणसिध्द मेंडगुदले, सुरेश पाटील, बाळासाहेब देशमुख, जेष्ठ पत्रकार अमोगसिध्द लांडगे, अमोगसिध्द मुंजे, शिवराज मुगळे, बबलू शेख व इतर उपस्थित होते.
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करणार-सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार
आपला सांस्कृतिक वारसा टिकवण्यासाठी सर्व मंडळांनी, मंडळाच्या प्रमुखांनी मिरवणुकीत डीजे डॉल्बी वापरास प्रतिबंध करावा. डीजे कल्चर भावी पिढीसाठी धोकादायक ठरत आहे. चुकीच्या गोष्टी बंद झाल्याच पाहिजेत. डीजे लहान मुलांसह वयोवृद्धांसाठी त्रासदायक ठरत आहे, अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागले आहे. डीजेपेक्षा सर्वच मंडळांनी पारंपारिक वाद्ये जी आपल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे, तो जपण्यासाठी, ती परंपरा पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. जर कोणी कायद्याचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी सांगितले.
