सोलापूर ( प्रतिनिधी )
शहरातील मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांचा तपास करताना सदर बाजार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तब्बल ११ मोटरसायकली चोरी केल्याचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी एक सिव्हील इंजिनिअरिंगचा दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असून, त्याच्या मदतीला स्वतःचे वडील – स्क्रॅप दुकान चालवणारे – आणि कामगारही गुन्ह्यात सहभागी असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या टोळीच्या तावडीतून २ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गस्तीदरम्यान पोलिसांच्या हाती लागला सुगावा
दि. ६ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजता सदर बाजार पोलिसांचे पथक गस्त घालत असताना, हरीभाई देवकरण प्रशालेच्या मागे संशयित तरुण हिरो फॅशन मोटरसायकल (एमएच १३ डीएफ ७३०४) घेऊन फिरताना दिसला. पोलिसांनी लोकेशन आणि मोबाईल ट्रेसिंगद्वारे पाठलाग करत साहिल महेबूब शहापुरे (वय २२, रा. दक्षिण सदर बाजार, सोलापूर) याला पकडले.
चौकशीत त्याने शहरातून अनेक मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. पंचनामा करून एकूण ११ मोटरसायकली (त्यातील तीन स्क्रॅप स्वरूपात) जप्त करण्यात आल्या.
गावागावात विक्रीचा नवा जुगाड
तपासात उघड झाले की, आरोपी शहरातून मोटरसायकली चोरून शहरालगतच्या गावांमध्ये विक्री करत होता. कमी किमतीमुळे शेतकरी अशा गाड्या विकत घेत, मात्र त्या चोरीच्या असल्याची त्यांना कल्पना नसे. बऱ्याच वेळा या मोटरसायकलींना नंबर प्लेटही नसायची.
बाप-लेकाचा गोरखधंदा
साहिल शहापुरे हा शिक्षण घेत असताना गुन्हेगारीकडे वळला. चोरी केलेल्या मोटरसायकली आपल्या वडिलांच्या स्क्रॅप दुकानात आणून स्क्रॅप केल्या जात, त्याचे स्पेअर पार्ट्स शहरातील ‘गुडलक ट्रेडर्स’कडे विकले जात. या कामात त्याचा वडील महेबूब शहापुरे, त्यांचा कामगार महेबूब उर्फ बाबू बागवान, तसेच गुडलक ट्रेडर्सचे मालक रहीम इरफान शेख हेही सहभागी असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
अटकेची तयारी
मुख्य आरोपी साहिल याच्यावर आधीच सातपेक्षा जास्त मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला यापूर्वी चार दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली होती, तर नुकतीच न्यायालयाने आणखी दोन दिवसांची वाढीव कस्टडी मंजूर केली आहे. लवकरच या गुन्ह्यातील इतर तिघांनाही अटक होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यशस्वी पोलिस कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त सुधीर किरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या गुन्हेप्रकटी करण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे सहा. फौंजदार औदुंबर आटळे शहाजहान मुलाणी राजेश चव्हाण संतोष पापडे सागर सरतापे इयाज बागल कोटे सागर गुंड सोमनाथ सुरवसे हणमंत पुजारी विशाल बोराडे अनमोल लट्टे उमेश चव्हाण राम भिंगारे परशुराम म्हेत्रे
अर्जुन गायकवाड यांनी पार पाडली.
