सोलापूर (प्रतिनिधी )
शहरातील गुन्हेगारी जगतावर मोठा धक्का बसवणारी घटना समोर आली आहे. तब्बल एक दशकभर सोलापूरमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या ‘सालार टोळी’वर अखेर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कडक कारवाई करत गुन्हेगारीला जबरदस्त दणका दिला आहे. मौलाना आझाद चौकात घडलेल्या हाणामारीच्या घटनेनंतर पोलिसांनी या टोळीविरुद्ध संघटित गुन्ह्याचे ठोस पुरावे सादर करून मोक्काच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हल्ल्याची पार्श्वभूमी:
दि. 2 जुलै 2025, दुपारी 2.30 वाजता, सोलापुरातील मौलाना आझाद चौक, नई जिंदगी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. सोहेल रमजान सय्यद या तरुणाने टोळीतील आरोपींकडे उसणे दिलेले पैसे परत मागितले असता, टोळीतील सदस्यांनी त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी आणि हातातील वस्तूंनी हल्ला केला.
या दरम्यान फैसल सालार याने चाकू दाखवत धमकी दिली, "मे इधर का भाई हूँ... कोई आगे आया तो खल्लास कर दूंगा!" असे म्हणत सोहेलच्या पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोहेलने डाव्या हाताने बचाव केल्याने त्याला गंभीर जखम झाली. या हल्ल्यामुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. व्यापाऱ्यांनी तात्काळ दुकाने बंद केली, तर नागरिकांनी घरी लपून आपली सुटका करून घेतली.
टोळीचा गुन्हेगारी इतिहास:
‘सालार टोळी’ ही सोलापूर शहरात 2015 सालापासून सक्रिय असून, तिच्या कारवायांमध्ये विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे समाविष्ट आहेत. टोळीतील प्रमुख आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
फैसल सालार (टोळीचा म्होरक्या)
जाफर शेटे टिपू सालार
पापड्या अक्रम पैलवान वसीम ऊर्फ मुकरी
या टोळीवर खंडणी वसुली, खुनाचा प्रयत्न, शस्त्रदारीने दहशत, मारहाण, धमकी देणे, तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करण्याचे अनेक गुन्हे दाखल असून, त्यांच्यावर एकूण १५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे नोंद आहेत. या टोळीने विशिष्ट भागात ‘दहशतीचं साम्राज्य’ निर्माण केले होते.
मोक्काचा धडाका:
या संघटित गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त मा. श्री. एम. राजकुमार यांनी 21 जुलै रोजी ‘मोक्का’ कायदा (Maharashtra Control of Organised Crime Act, 1999) लागू करण्यास मंजुरी दिली. यामध्ये कलम 3(1)(ii), 3(2) आणि 3(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोक्काच्या कक्षेत आल्यामुळे या टोळीवर आता जामीन नाकारण्याची शक्यता, मालमत्तेवर जप्ती, आणि विशेष न्यायालयात सुनावणी यांसारख्या कडक तरतुदी लागू होणार आहेत.
तपास पथक आणि पुढील कारवाई:
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजन माने यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, मुख्य आरोपींसह इतर फरार सदस्यांचा शोधही गुप्त पथकांमार्फत घेतला जात आहे.
सोलापूर शहर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस स्टेशन, आणि गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अलर्टवर असून टोळीच्या नेटवर्कचा बिमोड करण्यासाठी पुढील काही दिवसांत आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
शहरात कायद्याचा ठसा – गुन्हेगारी जगताला इशारा:
सोलापूर शहरातील गुन्हेगारीवर पोलिसांनी अशा प्रकारे घातलेला ‘मोक्का’चा धडाका म्हणजे "दहशतीवर शिस्तीचा चाप" असल्याचे नागरिक आणि व्यापारी वर्गात समाधानाचे सूर उमटले आहेत. शहरातील काही भागांमध्ये अनेक वर्षे टोळीकडून खंडणी, धमकी आणि मारहाण यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असलेली भीती आता दूर होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
‘सालार टोळी’वर मोक्का अंतर्गत झालेली कारवाई ही सोलापूर शहरासाठी एक टर्निंग पॉईंट ठरू शकते. गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालणाऱ्या या कारवाईतून प्रशासनाचा संदेश स्पष्ट आहे – कोणतीही संघटित गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. पुन्हा एकदा सोलापूर चे युवा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी यहाँ के हम हें राजकुमार म्हणत बड्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.
