मुंबई, (प्रतिनिधी) पोलिस दलात ३० ते ४० वर्षे सेवा
बजावल्यानंतर निवृत्त झालेल्या पोलिस अधिकारी आणि आमदारांना मृत्यूनंतर सन्मानाने अखेरचा निरोप देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या महासंचालक कार्यालयाने घेतला आहे. महासंचालक रश्मी शुक्ला यांनी याबाबत सोमवारी (ता. २१) आदेश दिला.
निवृत्त अधिकारी, अंमलदाराच्या निधनाचे वृत्त समजताच संबंधित पोलिस कार्यालय त्या वृत्ताची खात्री करेल. पदानुसार पोलिस अधिकारी संबंधिताच्या निवासस्थानी गणवेशात उपस्थित राहून कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी मदत करतील. पोलिस दलाच्या वतीने लेखी शोकसंदेश, मृताच्या कुटुंबीयांना निवृत्तीवेतन, विमा आदी लाभ मिळवून देण्यात सहकार्य केले जाईल. महासंचालक दर्जाच्या निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यास 'गार्ड ऑफ ऑनर' दिला जाईल, तर मृत पोलिसाचे छायाचित्र, त्यांची सेवा, निधनाचे वृत्त दक्षता मासिकातून प्रसिद्ध केले जाईल. निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी माहिती संकलित करण्याची सूचना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिली आहे.
