सोलापूर (प्रतिनिधी) राष्ट्रीय व राज्य महामार्गावरून
रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या लोकांना अडवून लुटमार करणारे रेकॉर्डवरील तीन सराईत अंतरजिल्हा गुन्हेगार सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत काडतूसे, ५८ ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन कार, तीन दुचाकी, तीन मोबाईल, असा एकूण १२ लाख पाच हजार ६०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. रात्रीच्या वेळी
महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांना
अडवून लुटमार करून वाहने हिसकावून घेवून, त्यांना लुटण्याचे प्रकार वाढले होते. पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून दोघेजण देशी बनावटीच्या दोन गावठी पिस्टल व जिवंत काडतूसे घेऊन चोरलेल्या चारचाकीतून कारंबा रोडने जाणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांना कारंबा गावच्या पुढे काही अंतरावर रस्त्यालगतच्या एका झाडाखाली थांबलेल्या चैतन्य उर्फ भैय्या पांडुरंग शेळके( वय 23 राहणार
भोत्रा, ता. परांडा), करण शिवाजी भोसले
(वय २२, रा. खांडवी ता. बार्शी) या. दोघांना पकडले. अंगझडती घेतल्यावर त्यांच्याकडे दोन पिस्टल व तीन जिवंत काडतूसे मिळाली. शिवाजीने साथीदाराच्या मदतीने मिळून कुर्दुवाडी बार्शी रोडवर रात्रीच्या वेळी पिस्टलचा धाक दाखवून चारचाकी चोरल्याची बाब तपासात समोर आली. त्यानंतर चैतन्यच्या कब्जातील सोन्याचे लॉकेट आवाटी (ता. करमाळा) येथील बाळूमामा मंदीराजवळ बसलेल्या एका तरूणास पिस्टलचा धाक दाखवून हिसकावून घेतलेले होते. या गुन्ह्यात मारूती नागनाथ माने (रा. सुकटा, ता. भुम, जि. धाराशिव) याने पिस्टलची विकल्याने पोलिसांनी त्यालाही अटक केली. त्यांनी सोलापूर तालुका, बार्शी करमाळा कामती कुर्डुवाडी वैराग तुळजापूर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलिस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, पोलिस हवालदार धनाजी गाडे, मोहन मनसावाले, सागर ढोरे पाटील, अक्षय डोंगरे, सुनंदा झळके, चालक समीर शेख, तसेच मोहोळ पोलिस ठाण्याकडील अंमलदार दयानंद हेंबाडे, चंद्रकांत ढवळे, स्वप्निल कुबेर यांनी पार पाडली.
