अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक आज दिवसभरात स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय या अबाल वृद्धांच्या जयघोषात संपूर्ण आसमंत दुमदुमला. पहाटे ४ पासूनच श्रींच्या दर्शनाकरिता स्थानिक व परगावाहून आलेल्या भाविकांची गर्दी होती. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने दक्षिण महाद्वारालगत बॅरेकेटींगची सोय करून, भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता कापडी मंडप उभारून विशेष सोय करण्यात आली होती.
पहाटे २ वाजता पारंपरिक पद्धतीने श्रींची काकडआरती झाली. नगरप्रदक्षिणा वटवृक्ष मंदिर ते समाधी मठ ते पुन्हा मुख्य वटवृक्ष मंदिराकडे पहाटे ३ ते ४ या वेळेत निघाली. देवस्थानचे वतीने पारंपरिक लघुरुद्र सकाळी ६ वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रोचारात पार पडले, व नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा ज्योतीबा मंडपात सकाळी ७ वाजता देवस्थानचे चेअरमन प्रथमेश महेश इंगळे यांचे हस्ते व सत्संग महिला भजनी मंडळाच्या भजनाने करण्यात आली. सकाळी ११:३० वाजता देवस्थानची महानैवेद्य आरती संपन्न झाली. दुपारी १२ वाजता अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे हस्ते व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्तिथीत श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर दुपारी १२ ते ४ या वेळेत देवस्थानच्या पूर्वेकडील उपहारगृह परिसरात व भक्त निवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आला. हजारो स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. आज दिवसभरात मा.आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे, अक्कलकोटचे न्यायाधीश मुकूल कल्याणकर आदींनी दर्शन घेतले. स्वामी भक्तांना कमीत कमी वेळात सुलभतेने दर्शन होण्याकरिता समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्यामार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी व सेवेकऱ्यानी प्ररिश्रम घेतले.

