सोलापूर (प्रतिनिधी) घरफोडीसह जबरी
चोरी व दुचाकी चोरी करणाऱ्या संघटित टोळीतील तिघांवर पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. त्यांच्याविरुद्ध शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल असून त्यांनी गेल्या १० वर्षांत ८ जबरी चोऱ्या केल्याचे तपासात आढळले आहे.
बसण्णा सत्तु शिंदे (वय ३०, रा. न्यू शिवाजी नगर, गोंधळे वस्ती, सोलापूर), अक्षय सीताराम कांबळे (वय २४, रा. भारतरत्न इंदिरा गांधी नगर, गेंट्याल टॉकिजमागे, सोलापूर) व सूरज ऊर्फ भैय्या गुंडाप्पा सुरवसे (वय ३१, रा. सरवदे नगर, विडी घरकुल, सोलापूर) अशी मोक्कांतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
कर्नाटकातील लच्याण (ता. इंडी, जि. विजयपूर) येथील अर्जुन मल्लप्पा मुजगोंड हे २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पिकअपमध्ये ४० पोती कांदा, १० पोती उडीद घेऊन येथील बाजार समितीत
आले होते. मध्यरात्रीनंतर पहाटे ३ च्या सुमारास त्यांच्या वाहनातून धान्याची पोती चोरणाऱ्या तिघा अनोळखी इसमांनी गळ्यास चाकू लावून व धमकावून मोबाईल व ३ हजार ६०० ची रोकड लुटून नेली होती. तसेच त्यांनी कोणाला सांगितल्यास व परत येथे आल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
हवालदार महेश शिंदे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी बसण्णा व अक्षय यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून २ दुचाकी व ३ मोबाईल हस्तगत केले होते. त्यापैकी एका मोबाईल चोरीप्रकरणी जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल होता. तर दुचाकी चोरीप्रकरणी एमआयडीसी, जोडभावी तर अन्य मोबाईल चोरीप्रकरणी जेलरोड पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. पोलिस तपासात त्यांचा तिसरा साथीदार सूरज हा असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना अटकेनंतर ओळख परेडमध्ये त्यांना फिर्यादी मुजगोंड यांनी ओळखले.
संशयितांविरुद्ध दाखल गुन्हे
बसण्णा याच्याविरुद्ध २००८ ते २०२४ या कालावधीत वाहन चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न यासारखे ५७, अश्रय याच्याविरुद्ध चोरी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न असे ८ तर सूरज याच्याविरुद्ध दुखापत, जबरी चोरी, घरफोडीचे ८ दखलपात्र गुन्हे दाखल असल्याचे आढळले आहे
जेलरोडचे पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी तिघा संशयितांवर मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव आयुक्तालयाकडे पाठविला. पोलिस उपायुक्त दीपाली काळे व विजय कबाडे यांनी त्या प्रस्तावाची पडताळणी करून तो पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे पाठविला. त्यांनी शुक्रवारी त्याला मान्यता दिली. याप्रकरणी सहाय्यक पोलिस आयुक्त प्रताप पोमण तपास करत आहेत.
