गरिबीतून घडलेला आदर्श अधिकारी - संतोष रा.भोसले ( S. E)




        DON'T WASTE TIME OTHERWISE 

TIME WILL WASTE YOU 

   सोलापूर (प्रतिनिधी) हे ज्यांच्या आयुष्याचं ब्रिदवाक्य आहे आणि गरिबीला न जुमानता, झोपडीत राहून, रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास करून, अथक परिश्रमाने आपले इप्सित ध्येय प्राप्त केलेले आणि अनेक विद्यार्थ्यांसाठी आदर्श असलेले अधिकारी म्हणजेच श्री. संतोष रामचंद्र भोसले (साहेब)

”निराश मी होणार नाही, झुंजता संकटा सवे, 

मनी माझ्या जागतील आकांक्षाचे लाख दिवे, 

वेदना झाल्या तरीही अश्रू मी गाळणार नाही, 

मार्ग बिकट असला तरीही जिद्द मी सोडणार नाही”

असाच निर्धार मनाशी बाळगून त्यांनी शिक्षणाची कास धरली व कठीण मेहनत करून, अभ्यास करून आई-वडिलांचे आणि अर्थात स्वतःचे ध्येय, स्वप्न साकार करायचे ठरविले. 

 श्री. संतोष रामचंद्र भोसले साहेबांचा जन्म 5 फेब्रुवारी 1979 रोजी इंदापूर तालुक्यातील बावडा या छोट्याशा खेड्यातील वकील वस्ती येथे झाला. त्यांचे वडिल रामचंद्र धोंडीबा भोसले व आई मालन रामचंद्र भोसले यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखिची, होती. दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून तसेच साफ -सफा ईची कामे करून जेवढे पैसे मिळतील त्यावर दोन वेळचे पोटभर जेवणही मिळणे कठीण असायचे. रहायला घर नव्हते म्हणून दुसऱ्याच्या शेतात झोपडी बांधून 6 भावंडे व आई, वडिल रहात होते. अठराविश्व दारिद्रय काय असतं हे साहेबांनी लहानपणापासून अनुभवल होत. इयत्ता 9 वी पर्यंत त्यांना चप्पलही घालायला मिळाली नव्हती, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळेला जाताना पायाला उन्हाचे चटके बसू नये म्हणून पायाला कॅरिबॅग बांधायचे, अशातच एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे इयत्ता आठवीमध्ये स्कॉलरशीप परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे शिवाजी महाविद्यालय बावडा या त्यांच्या शाळेकडून त्यांना सायकल बक्षीस मिळाली होती याचा सर्व कुटूंबियांना खूप आनंद झाला होता. इयत्ता 10 वी च्या बोर्डाच्या परिक्षेत मित्रांची पुस्तके घेऊन अभ्यास केला आणि 82% गुण मिळवून मेरिट मध्ये आले याच मार्कांमुळे त्यांना पुणे विद्यापीठातील COEP या कॉलेजमधून Civil Engineering मध्ये) डिप्लोमा करण्याची संधी मिळाली. डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायच्या वेळेला जवळ कसलेच पैसे नव्हते. अशावेळेस गावातीलच सदगृहस्थ श्री. सदाशिव घोगरे यांनी व त्यांचे दोन्ही सुपूत्र श्री. धनंजय घोगरे (साहेब) व श्री. विजय घोगरे (साहेब) आणि त्या दोघांच्या सुविद्य पत्नी सौ. विजया धनंजय घोगरे व सौ. वंदना विजय घोगरे यांनी मोलाचे सहकार्य केले. 

 डिप्लोमा इंजिनिअरींग मध्ये फस्ट क्लास मिळाल्यामुळे श्री. तुळजाभवानी इंजिनिअरींग कॉलेज, तुळजापूर येथे बी.ई. सिव्हील इंजिनिअरींगसाठी प्रवेश घेतला परंतू तेथे अनेक आर्थिक अडचणी आल्या, त्यावेळी त्यांना 2 वेळचे जेवण करणेही परवडत नसे त्यामुळे त्यांनी अनेक दिवस केवळ बिस्कीट खाऊन दिवस काढले केवळ एक पुडा दोन्ही वेळेला पुरवून खाणे हेच त्यांचे जेवण असे नंतर तुळजापूर मधील राऊत मावशी ज्या मेस चालवत असत त्यांनी तु जेंव्हा नोकरीला लागशील तेंव्हा माझे पैसे दे असे सांगून जेवणाचा मोठा प्रश्न सोडविला तुळजापूरमध्ये शिकत असताना त्यांना त्यांच्या मित्रांनीही खुप आर्थिक मदत केली तसेच त्यावेळचे नगरसेवक आप्पा यांनीही मोलाचे सहकार्य केले. 

 बी. ई. सिव्हील ही पदवी संतोष भोसले साहेब विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले ते मराठवाडा विद्यापिठात सलग 4 वर्ष पहिले आले. त्यामुळे त्यांना सुवर्ण पदक व रोख पारितोषिक देऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते सन्मानित केले. त्यानंतर त्यांनी एम. ई. या पदविकेसाठी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला परंतू आर्थिक अडचणीमुळे ते दिवसभर कॉलेज व अभ्यास करायचे आणि रात्री एस.टी.डी. बुथवर नोकरी करायचे अशाप्रकारे ते एम.ई. पदवी फस्ट क्लास With distinction मध्ये पास झाले

 अशाप्रकारे अनेक अडचणीवर मात करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले कारण, 

”मनी संकल्प होता शिकुन सारी स्वप्नं साकार करण्याचा, 

आणि आदर्श होता बुध्द, फुले शिवराय, आंबेडकरांच्या विचाराचा ”

 त्यांनी विद्या प्रसारक मंडळ बारामती येथील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये काही वर्ष ॲसिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी केली याच दरम्यान पंढरपूर मधील आदर्श शिक्षक किसन विठ्ठल सरवदे (सर) व सौ. मिरा किसन सरवदे यांची मुलगी ॲडव्होकेट रेश्मा हिच्याशी 2007 मध्ये विवाह झाला व त्यांना तेजल नावाची हुशार, सोज्वळ कन्यारत्न आहे ती बाबासारखीच हुशार असून इयत्ता 10 वी आय.सी.एस.सी. परिक्षेत 4 विषयांमध्ये 100/100 गुण मिळवून शाळेत मुलींमधून पहिली आलेली आहे. 

 संतोष भोसले साहेबांनी आणि त्यांचे जिवश्च कंठश्च मित्र मिरगणे सर यांनी नंतर एम.पी .एस.सी. चा अभ्यास करून ती परिक्षा उत्कृष्ट मार्कांनी उत्तीर्ण झाले या दैदीप्यमान यशामुळे ते एज्युकेटिव्ह इंजिनीयर या पदी रूजू झाले व त्यानंतर 6 वर्षांनी सुपरिटेंडेंट इंजिनिअर (S.E.) या पदावर पदोन्नती मिळाली व उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. 

 खरोखरच आई-वडिलांना तसेच सर्व नातेवाईक, सर्व कुटूंबिय, मित्र मंडळींना त्यांचा सार्थ अभिमान आहे. 

 संतोष भोसले साहेबांच्या या संघर्षमयी यशस्वी वाटचालीला पाहून म्हणावेसे वाटते की, 

 आजचा 'संघर्ष' उद्याचे 'सामर्थ्य' निर्माण करतो, 

 संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की, 

 आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो

आणि

 रुबाब हा विकत घेता येत नाही, 

 तो व्यक्तीमत्वातून सिध्द होतो. 

अशा या कर्तव्यदक्ष अधिकारी श्री. संतोष रा. भोसले साहेबांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा...! ॲडव्होकेट - रेश्मा संतोष भोसले (BA,L.L.B,B E d,D.S.M )

Post a Comment

0 Comments