पंढरपूर (प्रतिनिधी )
कोणतेही वैद्यकीय
प्रमाणपत्र नसताना केवळ दहावी पास असलेल्या एका बोगस डॉक्टरने पंढरपुरात दवाखाना थाटल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. मागील तीन वर्षांपासून हा बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याची बाब देखील तपासामध्ये उघड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मधुमेह, हाडांच्या समस्यांसह विविध गंभीर आजारांवर उपचार करत होता. त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णांकडून तो हजारो रुपये उकळत होता. आरोपीने केवळ चार दिवसांचे ट्रेनिंग घेऊन हा दवाखाना सुरू केल्याची माहिती येथील उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक महेश सुडके यांनी दिली.
दत्तात्रय सदाशिव पवार असे या बोगस डॉक्टर चे नाव आहे
पवार हा मूळचा जालना येथील रहिवासी असून तो मागील तीन वर्षांपासून पंढरपूर आणि शेगाव याठिकाणी रुग्णांवर उपचार करत होता. याची माहिती पंढरपूर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना नसावी याचे नवल वाटत असून रुग्णाच्या जीवाशी खेळणारे अनेक बोगस डॉक्टर पंढरपूर तालुक्यात असून त्यांच्यावर कारवाई कधी?असा प्रश्न निर्माण झाला असून एकंदरीत पंढरपूर च्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे
पंढरपूर शहरातील जुना अकलूज रस्ता येथील चंद्रभागा बस स्थानकामागे नारायण देव बाबा भक्तनिवास येथे पवार याने दवाखाना सुरू केला होता. परिसरातील काही रुग्णांना याच्या बोगसगिरीवर संशय आला. यानंतर त्यांनी याबाबतची माहिती आरोग्य विभागाला दिली. तक्रार आल्यानंतर आरोग्य विभागाने पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने आरोपीच्या दवाखान्यावर छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी दत्तात्रय पवार हा मधुमेह आणि हाडांशी संबंधित रुग्णांवर
उपचार करत असल्याचे दिसून आले. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पवार याच्याकडे अधिकची चौकशी केली असता दवाखाना चालवण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले आहे. पवार हा केवळ दहावी पास असून त्याने दवाखाना सुरू करण्यापूर्वी साताऱ्यात चार दिवसांचे ट्रेनिंग घेतले होते.
याच आधारावर त्याने पंढरपुरात दवाखाना सुरू केला होता. मागच्या तीन वर्षांपासून तो याठिकाणी रुग्णांवर उपचार करत होता. प्रत्येक रुग्णांकडून तो ५०० रुपये फी घेत होता. 'दिवसाला ७० ते ८० रुग्णांवर तो उपचार करत होता. याप्रकरणी पोलिसांनी पवार याचा दवाखाना बंद केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
0 Comments