जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे -अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर




सोलापूर (प्रतिनिधी ) जिल्ह्यात अंमली पदार्थाचे उत्पादन व विक्री होणार नाही या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभागाने अत्यंत तत्पर राहावे. रासायनिक व साखर कारखाने, सर्व मेडिकल स्टोअर्स यांच्यावर ही नियंत्रण ठेवावे. तसेच वेळोवेळी तपासणी मोहीम राबवावी. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे अंमली पदार्थाची तस्करी होणार नाही या दृष्टीने सर्व संबंधित विभागानी आपापल्या स्तरावरून योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी केले.

       सोलापूर जिल्ह्यात अमंली पदार्थाचे सेवन व वापर तसेच अमंली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डीनेशन (NCORD) समितीची बैठक अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधिक्षक कार्यालय येथे घेण्यात आली. यावेळी पोलीस उप आयुक्त राजन माने, विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण ) डॉ. नलीनी टेंभेकर, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क एम.आर पाटील, मिलींद कारंजकर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मानसोपचार विभाग (सिव्हिल हॉस्पिटल), डॉ. वडजे सोलापूर विद्यापिठ , अधिक्षक सिमा शुल्क विभाग महेंद्र प्रताप , उपसंचालक औद्योगिक सुरक्षा ओंकार चौरे , जि.प. समाज कल्याण अधिकारी एच. गायकवाड, अधिष्ठाता श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय डॉ. अमित मोरे, अन्न औषध प्रशासन प्रतिनिधी श्री. बिरगे आदी उपस्थित होते.

     अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. यावलकर पुढे म्हणाले की, जिल्ह्यात टपाल व खाजगी कुरिअरव्दारे ड्रग्ज, गांजा, खसखस (आफू) अशा पदार्थांच्या ने- आण होते का याबाबत पोलीस विभागाने डॉग स्कॉड व्दारे तपासणी मोहिम घ्यावी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ व उच्चशिक्षण विभाग यांनी त्यांच्या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच पालकांसाठी जनजागृती पर कार्यक्रम घेऊन अंमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम सांगून त्यापासून दूर राहण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रबोधन करावे असे त्यांनी सुचित केले.       

 अन्नऔषध प्रशासन विभागाने मेडीकल स्टोअर, रासायनिक कारखाने तसेच साखर कारखाने या ठिकाणी कोणत्याही अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री होणार याबाबत दक्षता घेऊन तपासणी करावी. परमिट रूम, बार या ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबवून कठोर कारवाई करावी. जिल्ह्यात महामार्गाचे मोठे झाले निर्माण झालेले आहे त्या अनुषंगाने महामार्ग पोलीस यांनी इतर राज्यांमधून येणाऱ्या वाहनाची विशेषत: मोठे ट्रेलर मधून अंमली पदार्थाची वाहतूक होणार नाही या दृष्टीने उपाययोजना कराव्यात तसेच वेळोवेळी तपासणी मोहीम राबवावी असे निर्देश अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. यावलकर यांनी दिले.

      अंमली पदार्थाच्या अनुषंगाने समाज कल्याण विभाग व शिक्षण विभागाने समाजामध्ये व्यसनापासून दूर राहण्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवावी. समाज कल्याण विभागाने जिल्ह्यातील व्यसनमुक्ती केंद्राना निधी वेळेवर मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे श्री. यावलकर यांनी सांगून आरोग्य विभागाकडे या तीन महिन्यात अंमली पदार्थाच्या आहारी गेलेले नवीन व्यसनाधीन उपचार समुपदेशनाची माहिती घेतली.

      यावेळी श्री. यावलकर यांनी आरोग्य विभाग ,कृषी विभाग, नॅशनल हायवे, राज्य उत्पादन शुल्क, विद्यापीठ ,महाविद्यालये (उच्च शिक्षण विभाग) , टपाल विभाग, अन्न औषध प्रशासन विभाग, समाज कल्याण विभग (जि. प) ,औद्योगिक विभाग अशा विविध विभागा मार्फत अंमली पदार्थांच्या तस्करी प्रतिबंधाच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शन केले. सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी या अनुषंगाने आपल्या विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती बैठकीत सादर केली.

Post a Comment

0 Comments