सोलापूर (प्रतिनिधी ) वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारी येथे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून ११ जणांकडून ३० लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत रोख रक्कम मोटारसायकल फॉर्च्यूनर कार तसेच मोबाईल फोन असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे बंद करून त्यांच्यावर समूळ उच्चाटनाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार परिविक्षाधिन पोलिस अधीक्षक गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने कुंभारी येथील मल्लु सुतार यांच्या मालकीच्या जागेवर मटका जुगार
सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकला.
या कारवाईत मल्लु सुतार यांच्यासह ११ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम, एक मोटारसायकल, फॉर्च्यूनर कार तसेच ११ मोबाईल फोन असा एकूण ३० लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संशयितांविरुद्ध वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक थोरात माधव लोखंडे, सचिन पवार, शिवकुमार पाटील, खंडेराव कोरे, एहतेशाम शेख तसेच पोलिस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण व वळसंग पोलिस ठाण्याच्या पथकाने केली.
