सोलापूर (प्रतिनिधी ) मालवाहतूक कंटेनरचे सील तोडून त्यातील केल्विनेटर कंपनीचे एसी संच चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत १० लाख ५० हजार रुपये किमतीचे २८ एसी संच जप्त केले आहेत. या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी मालमत्तेविषयक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मोहोळ येथील शिवाजी चौक परिसरात तपासादरम्यान पोलीस अंमलदार मोहन मनसावाले यांना गोपनीय माहिती मिळाली की, टाकळी सिकंदर येथील कारखाना वसाहतीत काही व्यक्ती चोरीचा एसी माल विक्रीसाठी एकत्र जमल्या आहेत. माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने छापा टाकला.
छाप्यात दीपक बाबुलाल सोळूंके (वय ४७), शहाजी पठाण गायकवाड (वय २३) आणि प्रदीप रमेश चिंचकर (वय २६) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातील पत्राशेडमध्ये २८ केल्विनेटर एसी संच आढळून आले. संबंधित मालाबाबत कोणतेही वैध कागदपत्र अथवा मालकी हक्काचे पुरावे सादर करता आले नाहीत.
कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपींनी एप्रिल-मे २०२६ दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील सुपा येथून कोची (केरळ) येथे जाणाऱ्या मालवाहू कंटेनरचे सील तोडून चालकाच्या संगनमताने हा माल चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर हा माल टाकळी सिकंदर येथे लपवून ठेवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२९/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या एसी संचांची एकूण किंमत १० लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर तसेच नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, दिनेश पवार, अक्षय डोंगरे, ज्ञानेश्वर पाथरुट, जगदीश राठोड, प्रमोद शिंपाळे, योगेश जाधव आणि सतीश बुरकुल यांच्या पथकाने पार पाडली.
