सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील कुमठा नाका परिसरात दहशत माजविणाऱ्या आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या टोळीतील पाच जणांना सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त प्रितम यावलकर यांनी ही कारवाई केली. तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये
टोळीप्रमुख राजू मोहन जमादार (वय ४७), कृष्णा राजू जमादार (वय २०, दोघे हुच्चेश्वर नगर), दीपक रामशंकर जमादार (वय १९, महाराणा प्रताप झोपडपट्टी), सनी राम जमादार (वय २०) आणि राम शंकर जमादार (वय ४३, दोघे रा. हुच्चेश्वर नगर मठ भाग तीन) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी विरोधात
एमआयडीसी पोलिस ठाण्यात २०२३ ते २०२५ या कालावधीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जबरी चोरी, दुखापत करणे, बेकायदा जमाव जमवून दंगा घालणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे तसेच घातक शस्त्रांचा वापर करून परिसरात दहशत निर्माण करणे अशा गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आढळून आला होता.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अन्वये तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर पोलिस उपायुक्त यावलकर यांनी आदेश काढून या पाचजणांना सोलापूर शहर आणि ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. डॅशिंग पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर यांच्या धडाकेबाज कारवाई ने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
