सोलापूर (प्रतिनिधी)
(अ) फिर्यादी श्री. सतिश शिवप्पा सोलापूरे वय-62 वर्षे, व्यवसाय :- सेवानिवृत्त, रा. घर नं. 38, कित्तूर चिन्नम्मा नगर, विजापूर रोड सोलापूर हे दिनांक 21/11/2025 रोजी तळमजल्याच्या घरास कुलूप लावून, वरच्या मजल्यावर जावुन झोपले असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे तळमजल्याच्या बंद घराचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सुमारे 4,87,800/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले बाबत दिलेल्या फिर्यादी वरुन विजापूर नाका पो.स्टे सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं. 577/2025 भा.न्या.सं.2023 कलम 331(4), 305 (ए) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
(ब) तसेच त्याच दिवशी रात्री तक्रारदार श्री. एल.श्रवणकुमार लगुन वय-39 वर्षे, व्यवसाय :- नोकरी, रा. सध्या रा. बी-71, पाटील नगर, सैफुल, विजापूर रोड, सोलापूर यांचे देखील बंद घराचे अज्ञात चोरटयाने कडी, कोयंडा व कुलूप तोडून, घरातील कपाटात ठेवलेले सुमारे 19,33,000 रु. किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले.
(क) तसेच सदर परिसरात राहणा-या सौ. पुजा सचिन जाधव यांचे घरात देखील चोरी करण्याचा प्रयत्न झालेला होता. विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत एकाच रात्रीत 03 ठिकाणी अज्ञात चोरटयांनी घरफोडी-चोरी केल्याने, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी नमुद गुन्हे लागलीच उघडकीस आणणेबाबत गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेशीत केले होते.
वरील घडलेल्या घरफोडीच्या घटनांचे गांभीर्य ओळखुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळास भेट दिली. घटनास्थळाच्या परिसरातील प्राप्त सी.सी.टी.व्ही फुटेज व संकलित केलेल्या इतर तांत्रीक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केल्याची पथकाने खात्री केली. त्यादरम्यान सदरचा गुन्हा करणारे दोन इसमांबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शैलेश खेडकर यांचे पथकातील पोलीस अंमलदार- इम्रान जमादार यांना गोपनीय बातमी मिळाली की, चोरी करणारे सराईत गुन्हेगार राघवेंद्र उर्फ रघू उर्फ नागराज शंभू नाईक, वय- 32 वर्षे, मुळ रा. येडगुंजी मंदिर जवळ, मण्णेगीगांव ता. होन्नावार जि. कारवार राज्य कर्नाटक व त्याचा साथीदार लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक, वय-28 वर्षे, मुळ रा. सदाशिव नगर, बेळगांव राज्य कर्नाटक सध्या रा. वसूर, बेळगांव राज्य कर्नाटक हे त्यांनी चोरी केलेले सोने व चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी ते समर्थ सोसायटी ए जी पाटील कॉलेज परिसरात रात्रीच्या वेळी येणार आहेत. पथकानेत्या ठिकाणी सापळा लावला असता, बातमीतील वर्णनाचे सराईत गुन्हेगार हे त्याठिकाणी आल्याचे दिसताच त्यांना ताब्यात घेतले व त्यांचे झडतीमध्ये वर नमूद गुन्ह्यातील सोने व चांदीचे दागिने मिळून आले त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. मुददेमालाबाबत विचारणा केली असता, त्यांनी सदरचा मुद्देमाल हा " सैफुल येथील तीन घरे फोडून चोरी केला असल्याचे कबूल केले. तसेच सदरचा मुद्देमाल हा विजापूर येथे विकण्याचा प्रयत्न केला परंतू तेथे मुद्देमाल पावत्या नसल्याने विकत घेत नसल्याने, आम्ही सोलापूर येथे अनोळखी गि-हाईक पाहून मुद्देमाल विक्री करणार असल्याचे सांगितले. त्यावरून दोन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने नमूद गुन्ह्यातील 13.3 तोळे सोन्याचे दागिने व 1 किलो 804 ग्रॅम चांदीचे दागिने व वस्तू असा एकुण 20,00,180/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन, विजापूर नाका पो.स्टे हद्दीत घडलेला गंभीर घरफोडीचा गुन्हा अत्यंत कमी वेळात, कौशल्याने व अविरत परीश्रमाने उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. एम.राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे, श्री.राजन माने सहा.पोलीस आयुक्त गुन्हे तसेच श्री. अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, महेश रोकडे, इब्राहिम शेख, चालक बाळासाहेब काळे, घोरपडे तसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड, रतिकांत राजमाने यांनी केली आहे.
