सोलापूर (प्रतिनिधी ) सलग सहा महिने रेशनधान्य दुकानातून धान्य न घेणाऱ्या रेशनकार्डधारक कुटुंबांचा लाभ आता कायमचा बंद होणार आहे. प्रत्येक सहा महिन्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना अशा रेशनकार्डधारकांची यादी पाठविली जात आहे.
सोलापूर शहरातील साडेतीन हजार रेशनकार्डधारकांनी सलग सहा महिने धान्य घेतलेले नव्हते. त्यांची यादी सहा महिन्यांपूर्वी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना आली होती. त्यानुसार ते रेशनकार्ड 'सायलेन्ट'
समजून त्या रेशनकार्ड धारकांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांचा धान्य देण्याचा लाभ बंद करण्यात आला आहे. याशिवाय आता आणखी १६०० रेशनकार्डधारकांची यादी
शासनाकडून पाठविण्यात आली असून त्यांचाही लाभ बंद झाला आहे. असे रेशनकार्डधारक 'एनपीएस' (बिगरप्राधान्य कुटुंब लाभार्थी) योजनेत वर्ग केले जातात. दुसरीकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुमारे नऊ ते दहा हजार रेशनकार्डधारकांचा
लाभ या निकषांनुसार बंद झाला आहे. सलग सहा महिने धान्य न घेतलेल्यांना रेशन दुकानातील
धान्याची गरज नाही, असे समजून त्यांचा धान्याचा हक्क पुढे बंद होतो, असा हा नियम आहे.
प्राधान्यक्रम कुटुंबातील रेशनकार्ड धारकांना शासनाकडून स्वस्तात दरमहा धान्य दिले जाते पण सलग सहा महिने धान्य न उचलणाऱ्या रेशनकार्ड धारक कुटुंबास स्वस्तातील धान्याची गरज नाही असे समजले जाते अश्या रेशनकार्ड धारकांची यादी शासनाकडून दर सहा महिन्याला पाठवली जात आहे त्यानुसार संबंधीतांची पडताळणी करून त्यांचा लाभ बंद केला जात आहे
ओंकार पडोळे
अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर
