सोलापूर (प्रतिनिधी ) विक्री करण्याच्या उद्देशाने घरात बेकायदा ठेवलेला आठ किलो गांजा बझार पोलिसांनी जप्त केला आहे. कुमठा नाका परिसरातील भारत नगरात पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी ठोठावली आहे.
८ मे रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास मुजमिल शेख याने त्याच्या घरात दोन पिशव्यांमध्ये आठ किलो १८२ ग्रॅम गांजा ठेवला होता. पोलिसांना खबर मिळताच पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांच्या नेतृत्वातील पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी एका प्लास्टिकच्या पिशवीत हिरवट-पिवळा काळसर रंगाचा दोन किलो गांजा ठेवलेला होता. तर एका गोणीत सहा किलो १८२ ग्रॅम गांजा ठेवलेला
आढळला. दोन लाख रुपयांचा गांजा दोन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून तो कोणालातरी विक्री करण्याच्या हेतूने मुजमिल याने ठेवला होता. त्याने हा गांजा कृष्णा शंकर खरात याच्याकडून घेतल्याचे सांगितले. गांजा एकमेकांना देणारे दोघेही मूळचे वडजी येथील आहेत.
*दोघेही १९ वर्षांखालील, मुख्य आरोपीचा शोध सुरू*
सोलापुरात यापूर्वी गांजा बाळगणे, वाहतूक करणे असे गुन्हे दाखल आहेत. मात्र दोन्ही संशयित आरोपी १९ वर्षांखालील असून, ते पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. या तरुणांना अशा अवैध धंद्यात उतरविणारा मुख्य आरोपी कोण, याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे तपास करत आहेत.
.jpg)