सोलापूर (प्रतिनिधी)
सोलापुर शहर मध्य मतदारसंघातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. तब्बल १२ कोटी रुपयांचा विशेष निधी शहर मध्य मतदारसंघातील ४६ रस्त्यांच्या विकासासाठी मंजूर करण्यात आला असून, लवकरच या भागातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांचे काम सुरु होणार आहे.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुर्दशा नागरिकांच्या तक्रारींचे मुख्य कारण होती. विशेषतः कामगार वस्ती, शाळा-महाविद्यालय परिसर, बाजारपेठा, लघुउद्योग व सरकारी कार्यालये असलेल्या या मतदारसंघात रस्त्यांची सुधारणा अत्यंत आवश्यक होती.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदारपदी निवडून आलेले देवेंद्र कोठे यांनी ही समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर मांडली. नागरिकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत, राज्य शासनाने शहर मध्य मतदारसंघातील रस्त्यांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
या निधीतून शहरातील हद्दवाढ भागांपासून ते गावठाण परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक सुलभ होणार आहे.
भाजपाचे आमदार गेल्या १५ वर्षांत या मतदारसंघात नसल्याने भाजप विचारसरणीच्या नागरिकांच्या भागात विकासकामांना गती मिळाली नव्हती. मात्र आता सत्ताधारी आमदाराच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे या भागातील विकासकामांना वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेला १२ कोटी रुपयांचा निधी म्हणजे शहर मध्य मतदारसंघाच्या विकासाला चालना देणारा निर्णय आहे. नागरिकांच्या आकांक्षांना दिशा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शहर मध्यचा विकास थांबणार नाही.”
– आ. देवेंद्र कोठे, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ.
