सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेससोबत केलेली युती मला व कार्यकर्त्यांना मान्य नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी भाजप स्वतंत्रपणे बाजार समितीची निवडणूक लढवेल, अशी भूमिका दक्षिण सोलापूरचे आ. सुभाष देशमुख यांनी मंगळवारी घेतली आहे. त्यामुळे त्यांची ही भूमिका भाजपचे आ. सचिनदादा। कल्याणशेट्टी यांना आव्हान देणारी ठरली आहे.
राज्यात भाजपची सत्ता आहे. शिवाय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारसंघात पक्षाचे दोन आमदार आहेत. अशी चांगली स्थिती असतानाही जिल्हाध्यक्ष तथा आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेससोबत केलेली युती आम्हाला अमान्य आहे. पालक या नात्याने त्यांनी मला कोअर कमिटी आणि मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा सांगायला हवी होती. पण, मला कळवले गेले नाही. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढण्याचे आदेश दिले आहेत. पक्षाचा आदेश पाळत आम्ही कार्यकर्त्यांसाठी लढू, अशी भूमिका आ. सुभाष देशमुख यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. चनगोंडा हविनाळे, होटगीचे सरपंच अतुल गायकवाड आदी उपस्थित होते.
आ. देशमुख म्हणाले, बाजार समितीची निवडणूक लागल्यापासून भाजपच्या कार्यकर्त्यांची सहावेळा बैठक घेतली. एका बैठकीला आ. कल्याणशेट्टी, आणि आ. देवेंद्र कोठे आले होते. भाजप कोअर कमिटीत निवडणुकीबाबत काय निर्णय झाला हे लोकप्रतिनिधी म्हणून मला त्यांनी कळवले असते तर अधिक आनंद वाटला असता. पक्ष व कोअर कमिटीने निर्णय घेतला असेल कोअर कमिटीत चर्चा झाली असेल आणि तिथूनच मुख्यमंत्र्यांना फोन गेलाही असेल. परंतु मला वरिष्ठांकडून किंवा स्थानिक नेत्यांकडून काहीही कळवले गेले नाही. काँग्रेस सोबतची युती कार्यकर्त्यांना मान्यच नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून पार्टीने आ. कल्याणशेट्टी यांना काही निर्णय दिले असतील तर मला माहीत नाही.
