सोलापूर (प्रतिनिधी) सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या तरुणास समजावून सांगण्याच्या प्रयत्न करणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकालाच • त्याने मारहाण केली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी रामलाल चौकातील प्रजा मटन स्टॉललगत घडला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने असे जखमी अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी नाईन्ट्या ऊर्फ ओंकार संतोष नलावडे याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
संशयित आरोपी नाईन्टया ऊर्फ ओंकार नलावडे आणि त्याचे अन्य दोन-तीन साथीदार प्रजा मटन स्टॉलच्या बाजूला तक्रार करीत होते. त्यावेळी नाईन्टया ऊर्फ ओंकार याने स्वतःहून फुटपाथवर डोके व तोंड आपटून घेत असल्याने त्याच्या डोक्यातून रक्त येत होते. त्यास रिक्षातून पोलिस ठाण्यात आणताना
रिक्षातील पोलिस हवालदार दिनेश घंटे यांच्या अंगावर थूकून त्याने शिवीगाळ केली. घंटे यांच्या शर्टाला धरुन ओढाओढी केली. पोलिस ठाण्यात उपचाराची वैद्यकीय यादी तयार करत असताना नाईन्ट्याने तेथील कर्मचाऱ्यास शिवीगाळ करुन पुन्हा अंगावर थुंकला. पोलीस ठाण्याच्या आवारात आरडाओरडा करीत असताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यास शांत बसण्यास सांगितले. त्यावेळी त्याने श्री. माने यांच्या छातीवर डावे बाजूस हाताने बुक्की मारली. त्यास अडवत असताना त्याने माने यांच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ पुन्हा मारहाण केली. नाईन्ट्या ऊर्फ ओंकार नलावडे याने शासकीय कामात अडथळा आणून पोलिस हवालदार घंटे यांना धक्काबुक्की करुन गोंधळ घातला, असेही फिर्यादीत नमूद आहे.
----------------------------------
कलम ३०७ मध्ये नाईन्ट्याला कोठडी
महिलेची छेडछाड करून तिचा मुलगा व भावाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नाईन्ट्याविरूद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात सध्या तो अटकेत असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. सहायक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे तपास करीत आहेत.

