सोलापूर(प्रतिनिधी ) पूर्वीचा गुन्हा मागे घेण्यासाठी व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत १५ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा जोडभावी पेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. खंडणीची रक्कम स्वीकारताना दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात चा आली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई शुक्रवारी (ता. ९) दुपारी पावणे दोनच्या सुमारास जोडभावी पेठेतील नेताजीनगर परिसरात करण्यात आली. पूजा ढवळे (रा. शिवगंगा नगर), मिलिंद कांबळे (रा. बुधवार पेठ) व लक्ष्मी लोंढे (रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५० हजार रुपयांची रोकड व १३ लाख रुपयांचे दोन धनादेश जप्त करण्यात आले.
या प्रकरणी जितेंद्र रामहरी भोसले (वय ४२, रा. नेताजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांनी सुरवातीला दोन कोटी, त्यानंतर एक कोटी रुपयांची मागणी केली होती. अखेरीस १५ लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र, भोसले यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्याने पोलिसांनी सापळा रचला.
पोलिसांनी पंचांसमक्ष नोटांवरील व धनादेशांवरील क्रमांक नोंदवून घेतले होते. हॉटेलमध्ये पैसे व धनादेश स्वीकारताच साध्या वेशातील पोलिसांनी
तिघांना ५० हजार रुपयांची रोकड व १३ लाख रुपयांचे दोन धनादेश घेताना रंगेहाथ पकडले. तपासात संशयितांकडे शपथपत्रे आढळून आली असून, गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात पैसे उकळ्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असून, या टोळीत आणखी असल्याचा संशय पोलिसांनी केला आहे.
*शपथपत्रातून उघडकीस आले खंडणी मॉडेल*
पोलीस तपासात संशियताकडे सापडली तीन शपथपत्रे या शपथ पत्रात गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात आर्थिक हमी मासिक रक्कम किंवा इतर लाभ देण्याच्या अटी नमूद आहेत यावरून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणी वसुल करण्याचा सुनियोजीत प्रकार सुरु असल्याचे उघड झाले या आधारे पोलीस आणखी गुन्ह्याचा तपास करत आहेत.
खंडणी प्रकरणी अटकेतील तिघांही संशयीतांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे त्यांच्याकडे शपथपत्रे मिळाली आहेत पैशाची हमी व गुन्हे दाखल करणार नसल्याचे त्यात लिहिले आहे संशयीतांचा तपास सुरु असून गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी वसुल करण्याची ही टोळी आहे यात आणखी संशयितांचा समावेश आहे त्या दृष्टीने तपास सुरु आहे
विष्णू गायकवाड -सहाय्यक पोलीस निरीक्षक जोडभावी पेठ पोलीस ठाणे
