Type Here to Get Search Results !

अपहृत बालक प्रकरणाचा अवघ्या ८ तासांत पर्दाफाश : फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षम तपासाची उल्लेखनीय कामगिरी




सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर परिसरातील एका फिरस्ती महिलेच्या चार महिन्यांच्या बालकाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना २९ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. मात्र फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अल्पावधीत कौशल्याने तपास करत अवघ्या ८ तासांत अपहृत रियान निजाम शेख या बालकाचा शोध घेऊन त्याला सुखरूप आईच्या स्वाधीन केले. या कामगिरीने संपूर्ण शहरात पोलीस दलाबद्दल कौतुकाची लाट उसळली आहे.

    फिरस्ती महिलेला झोपेतून जाग येताच गोंधळ


फिरस्ती महिला सौ. समिना निजाम शेख, वय ३०, मूळ राहणार मस्साजोग (ता. केज, जि. बीड), सध्या सिद्धेश्वर मंदिर परिसरात फुटपाथवर आपल्या दोन मुलांसह वास्तव्यास आहे. ती मिळेल ते खाऊन-पिऊन उदरनिर्वाह करत आहे. दिनांक २८ जुलै रोजी रात्री ११ वाजता ती सिद्धेश्वर प्रशालेसमोरील स्टेशनरी दुकानासमोर झोपली होती. सकाळी २९ जुलै रोजी ६ वाजता जाग आल्यावर तिला लक्षात आले की तिचा चार महिन्यांचा मुलगा रियान तिच्या शेजारी नाही. तिने परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु रियान कुठेही मिळून आला नाही.

पोलिसात तक्रार दाखल, तत्काळ गुन्हा नोंद


परिसरातील एका व्यक्तीच्या सल्ल्याने समिना शेख यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तात्काळ गांभीर्य ओळखून गुन्हा रजि. नं. ५६५/२०२५, भा.दं.वि. कलम ३७५(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी सपोनि क्षिरसागर व डीबी पथकास शोध मोहीमेसाठी निर्देश दिले.


 सीसीटीव्ही फुटेजचा वापर, संशयित ओळख पटवली


पोलीसांनी घटनास्थळी व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. त्यात एक पुरुष व महिला एका बाळासह जाताना दिसले. सीसीटीव्ही मधील स्पष्ट चित्रणानुसार पोलीसांनी गुप्त बातमीदारांच्या साहाय्याने त्या दोघांचा तपास केला. यामध्ये मुन्ना उर्फ मुन्ना अलिसाब शेख (वय २७) व शबाना अमीन शेख (वय ३५, दोघेही रा. हत्तुरे वस्ती) यांची ओळख पटली.


संशयितांकडून बालकाची सुटका


पोलिसांनी तात्काळ मुन्ना शेख याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने बाळाला शबाना शेख हिच्या घरात ठेवले असल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलीसांनी शबाना शेख हिला ताब्यात घेतले व अपहृत बालक रियान याला सुखरूप तिच्या ताब्यातून हस्तगत केले.


आईच्या डोळ्यांत अश्रू, पोलीसांचे आभार


अपहरणकर्त्यांकडून बाळाची सुटका करून, पोलिसांनी तो समिना शेख हिच्या स्वाधीन केला, त्यावेळी समिनाच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. तिने भावनिक स्वरात पोलीसांचे शतशः आभार मानले. "माझं बाळ मला परत मिळालं, हे फक्त पोलीसांमुळे शक्य झालं" असे तीने सांगितले.


👮‍♂️ कामगिरीसाठी पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन


या प्रकरणात पोलिसांनी ज्या तत्परतेने कामगिरी केली, त्याबद्दल पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, सहायक आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोनि तानाजी दराडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.


तसेच सपोनि संजय क्षिरसागर, सपोनि विजय जाधव, पोह. चुंगे, पोकॉ. बडुरे, पोकॉ. पुजारी, होटकर, खरटमल, तलवार, दराडे, घोडके, गळाकाटे यांनी या शोध मोहीमेत मोलाचे योगदान दिले.


     🧩 पुढील तपास सुरूच


बालकाचे अपहरण करण्यामागचे नेमके कारण, अपहरणकर्त्यांचे उद्दिष्ट, यांचा पोलीस कसून तपास करत असून, या घटनेत अजून कोणी सामील आहे का? याचाही शोध घेतला जात आहे.


सिद्धेश्वर मंदिर परिसरात फुटपाथवर झोपलेल्या एका गरीब फिरस्ती महिलेच्या चार महिन्यांच्या बाळाला अपहरणकर्त्यांनी पळवून नेले. पण फौजदार चावडी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि तत्परतेने केवळ ८ तासांत हे प्रकरण उघडकीस आणून, बाळाला सुखरूपपणे परत आणले. ही एक शहर पोलिसांच्या कार्यक्षमता आणि संवेदनशीलतेची जिवंत उदाहरण ठरली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.