सोलापूर (प्रतिनिधी ) टेंभुर्णीतील स्थानिक गैंगमध्ये काम करणाऱ्या बेंबळे (ता. माढा) येथील अभिषेक ऊर्फ भैया गायकवाड (वय २८) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. त्याच्याकडे एक बंदुक व एक जिवंत काडतूस मिळाले
बार्शी तालुक्यात अवैध बंदुकीचा वापर करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबतचा गुन्हा दाखल झाला होता. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये अवैध बंदूक बाळगणाऱ्यांच्या शोधाचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक टेंभूर्णी पोलिस
ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या समांतर तपासासाठी टेंभूर्णी हद्दीतील करमाळा चौकात गेले होते. त्यावेळी पथकातील पोलिस हवालदार मोहन मनसावाले यांना बेंबळे येथील पैलवान अभिषेक गायकवाड बद्दल गोपनीय खबर मिळाली. तो टेंभूर्णीतील हॉटेल सागर परमिट रुम येथे अवैध बंदुकीसह बसला होता. त्यांनतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक दोन पंचासह हॉटेलमध्ये
पोचले. पोलिसांनी त्याला पकडून अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्या कंबरेला मॅगझीनसह एक गावठी पिस्टल व मॅगझीनमध्ये एक जिवंत राऊंड मिळाले. त्याच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप, टेंभूर्णी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस अधीक्षक श्री. आत्राम यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्रेणी पोलिस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहायक पोलिस उपनिरीक्षक नारायण गोलेकर, पोलिस अंमलदार धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय डोंगरे, संदीप हुलगे, चालक सतीश बुरुकुल यांच्या पथकाने पार पाडली. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत मदने तपास करीत आहेत.
